वाळूज महानगर, (प्रतिनिधी) एके ठिकाणी गोळीबार झाला आहे, अशी खोटी माहिती देऊन, आपत्कालीन क्रमांकाचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य हरिचंद्र हिवाळे (३०, रा. लवकी वस्ती, ता. गंगापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी (दि. २५) रात्री ११:३० वाजता आदित्यने कोणतीही घटना घडलेली नसताना, केवळ खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला.
गंगापूर तालुक्यातील लवकी वस्ती येथे गोळीबार झाल्याची खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली. या खोटया कॉलमुळे पोलिसांची गैरसोय व दिशाभूल झाली. याप्रकरणी अंमलदार दीपक हिवाळे यांच्या फिर्याद दिली होती. पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच नागरिकांनी आपत्कालीन क्रमांकावर अशा प्रकारे खोट्या बातम्या देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.













